सध्या थंडीची लाट कायम; पण नोव्हेंबरअखेर आणि डिसेंबरच्या सुरुवातीला अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा धोका
राज्यात सध्या उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे थंडीचे प्रमाण खूप वाढले आहे, ज्यामुळे दिवसादेखील थंड हवामान जाणवत आहे. हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वातावरणामुळे शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा या पिकांची पेरणी करण्यास हरकत नाही, मात्र थंडी अधिक असल्याने स्वतःची आणि पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे.
२४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यानचा पावसाचा अंदाज
राज्यात २४ व २५ नोव्हेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पडणार नाही. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ या राज्यांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे, त्यांच्या सीमालगतच्या जिल्ह्यांमध्ये या पावसाचे तुरळक थेंब दिसू शकतात. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पंढरपूर, पुणे, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांच्या काही भागांत २४-२५ नोव्हेंबरला रिमझिम स्वरूपाचा किंवा सडा टाकल्यासारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे पट्ट्यात पावसाची शक्यता थोडी जास्त असली तरी, हा पाऊस मोठा नुकसानीचा नसेल. नाशिक आणि इगतपुरीकडे थंडी जास्त असल्याने पावसाचा फारसा परिणाम जाणवणार नाही.
















