पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २१वा हप्ता देशभरातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकताच वितरित करण्यात आला. या माध्यमातून सुमारे १८ हजार कोटी रुपयांचे वितरण झाले असले तरी, महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्या खात्यात हप्ता का जमा झाला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, राज्यातील तब्बल २ लाख ४८ हजार ३२ शेतकरी या योजनेच्या २१व्या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत. राज्याच्या लाभार्थी संख्येत झालेली ही मोठी घट अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.
लाभार्थी संख्येत झालेली लक्षणीय घट
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत झालेली घट पाहता, अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या स्पष्टपणे दिसून येते. २०वा हप्ता वितरित झाला तेव्हा राज्यातील ९२ लाख ८९ हजार २७३ शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. यानंतर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील ९१ लाख ६५ हजार १५६ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला होता.
मात्र, आता २१व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या ९० लाख ४१ हजार २४१ पर्यंत खाली आली आहे, ज्यासाठी १८०८ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. याचा अर्थ, केवळ २०व्या आणि २१व्या हप्त्याच्या दरम्यान २ लाख ४८ हजार ३२ शेतकरी अपात्र ठरवण्यात आले आहेत.
शोध मोहिमेतून ‘हे’ शेतकरी ठरले अपात्र
शेतकऱ्यांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पीएम किसान योजनेअंतर्गत राबवण्यात आलेली कठोर ‘शोध मोहीम’ आहे. या मोहिमेचा उद्देश अपात्र लाभार्थ्यांना वगळून केवळ गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच लाभ देणे हा होता.
या मोहिमेत अपात्र ठरलेल्यांमध्ये प्रामुख्याने अनेक प्रकारच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. यात सर्वात आधी एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य, जसे की पती, पत्नी आणि १८ वर्षांखालील मुल हे लाभ घेणारे शेतकरी वगळण्यात आले आहेत. दुसरे म्हणजे, नावावर जमीन नसतानाही चुकीच्या पद्धतीने नोंदी लावून योजनेसाठी अर्ज केलेले लाभार्थी यादीतून बाहेर झाले आहेत. याव्यतिरिक्त, मृत झालेले (मयत) शेतकरी किंवा आपली जमीन विकलेले शेतकरी देखील यादीतून वगळण्यात आले आहेत.
‘नमो शेतकरी’ योजनेवर होणार परिणाम
या शोध मोहिमेमुळे राज्यातील २ लाख ४८ हजार ३२ शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या सुधारित आणि कमी झालेल्या लाभार्थ्यांच्या आधारावरच भविष्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा पुढील हप्ता देखील वितरित केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांची नावे या सुधारित यादीत आहेत, त्यांनाच पुढे नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार हे निश्चित झाले आहे.