चक्रीवादळ ‘दितवाह’चा अंश चेन्नईजवळ; थंडी वाढणार, पण दक्षिण महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता.
चक्रीवादळाची स्थिती आणि पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव
चक्रीवादळाचा राहिलेला अंश आता डीप डिप्रेशनच्या स्वरूपात चेन्नईच्या जवळ पोहोचत आहे. या वादळामुळे दक्षिण भारतात परिणाम दिसत आहे, ज्यामुळे आंध्रप्रदेश किनारपट्टीकडे ढगांची दाटी आहे. मात्र, अरबी समुद्रातून आलेले कोरडे वारे प्रणालीत मिसळल्याने या वादळाचा बराचसा भाग कमकुवत बनला आहे. हे डिप्रेशन चेन्नईच्या आसपास पोहोचून त्यानंतर त्याचा राहिलेला अंश उत्तरेकडे जाऊन पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पूर्वेकडचे वाऱ्यांचा प्रभाव दक्षिण मध्य महाराष्ट्रात प्रबळ होण्याची शक्यता आहे.
राज्यात थंडीचा जोर वाढणार
राज्यात या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी कडाक्याची थंडी पाहायला मिळेल. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत गारठा पोहोचत आहे. खासकरून, विदर्भ, मराठवाडा भाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळू शकते, तर बऱ्याच भागांमध्ये हे तापमान १० ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विदर्भाकडे सुरुवातीला पूर्वेकडील वारे वाहतील, ज्यामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर येथील थंडी काही प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आहे, पण त्यानंतर थंडी पुन्हा टिकून राहील.
















