शासनाचा हमीभाव ८,११० रुपये, प्रत्यक्षात बाजारात ७,३०० रुपयांपर्यंतचाच भाव; ओलाव्याच्या नावाखाली १०% कपात होत असल्याने दुहेरी फटका.
राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे केंद्र शासनाने लांब धाग्याच्या कापसासाठी ८,११० रुपये प्रति क्विंटल हमीभाव (MSP) जाहीर केला असताना, मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना आपला कापूस हमीभावापेक्षा तब्बल ८०० ते ९०० रुपये कमी दराने विकावा लागत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बाजार समितीच्या पावत्यांवरून ही धक्कादायक माहिती समोर आली असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि हताशेचे वातावरण आहे.
हमीभाव केवळ कागदावरच, बाजारात लूट
केंद्र सरकारने २०२४-२५ हंगामासाठी लांब धाग्याच्या कापसाला ८,११० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, मानवत बाजार समितीत २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या व्यवहारांच्या पावत्यांनुसार, कापसाला केवळ ७,०२५ रुपयांपासून ते सर्वाधिक ७,२९५ रुपयांपर्यंतचाच दर मिळाला आहे. याचाच अर्थ, शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल थेट ८०० ते ९०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. सरकारी खरेदी केंद्रांवर होणारी गर्दी, पेमेंट मिळण्यास होणारा विलंब आणि पैशांची तात्काळ गरज यामुळे अनेक शेतकरी नाईलाजास्तव कमी दरात व्यापाऱ्यांना कापूस विकत असल्याचे चित्र आहे.

























